महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील दोन मल्ल तीन वर्षांसाठी निलंबित
अहिल्यानगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी
गोंधळाचे गालबोट लागले. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान शिवराज राक्षे याने थेट पंचांना लाथ मारली आणि मातीवरच्या कुस्तीत अव्वल स्थान पटकावून पदकासाठी अंतिम लढत लढणारा महेंद्र गायकवाड याने अर्धवट कुस्ती सोडून दिल्याने शिवराज आणि महेंद्र यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतच हा गोंधळ झाला. उपांत्य फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने शिवराजला ढाक डाव टाकून चितपट केले. पंचांनी मोहोळला विजयी जाहीर केले. त्यानंतर पृथ्वीराजच्या समर्थकांनी त्याला उचलून घेत जल्लोष केला. शिवराजने या निर्णयाला आव्हान दिले. त्याचे प्रशिक्षकही ‘चॅलेंज’ स्वीकारा अशी मागणी करत
होते. पण पंचांनी त्यांचे आव्हान फेटाळून लावले. शिवराज हा कुस्ती महासंघाचे कार्याध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे यांच्याकडे दाद मागत होता. ते त्याची समजूत काढत होते, पण चिडलेल्या शिवराजने काहीच ऐकले नाही.
चिडलेल्या शिवराजने पंच दत्ता माने यांची कॉलर पकडून त्यांना लाथ मारली. त्यात ते खाली कोसळले. त्यामुळे सर्व पंच चिडले. यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी शिवराजला बाहेर नेले. ‘मी पराभूत झालेलो नाही. माझे दोन्ही खांदे टेकले नव्हते. त्यामुळे कुस्ती चितपट झालेली नाही. ‘व्हिडिओ’ बघून ‘रिव्ह्यू’ घ्या. माझे म्हणणे ऐकले जात नाही,” असा आरोप शिवराज
राक्षेने केला. तर, शिवराजने पंचांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यावर बंदी घाला असे मागणी पंच करीत होते.
शिवराज पुन्हा मैदानात येत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसांनी त्याला बाहेर नेले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांनी महाराष्ट्र केसरीचे मल्ल शिवराज आणि पृथ्वीराज यांना अडवून धरले. तोपर्यंत कुस्ती लावण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे ताटकळले होते. मग माती विभागातील कुस्ती लावण्यात आली. त्यात महेंद्र गायकवाडने विजय मिळवला. त्याने साकेत यादवला चितपट केले.
यानंतर महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यात अंतिम लढत झाली त्यात दुसऱ्या फेरीत दोघेही प्रत्येकी एक गुण घेऊन लढत होते, मात्र एका डावावर पंचांनी पृथ्वीराज याला दुसरा गुण दिल्यावर नाराज होऊन महेंद्र मैदानाबाहेर गेला तो परतलाच नाही परिणामी पृथ्वीराज मोहोळ याला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आले.
स्पर्धेनंतर झालेल्या तातडीच्या बैठकीत दोन्ही मल्लांच्या बेशिस्तीवर चर्चा होऊन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली.
ML/ML/PGB
3 Feb 2025