सरसकट सफाई कामगारांना मिळणार वारसा हक्काचा लाभ…
ठाणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे आता सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्याने भक्कमपणे कर्मचाऱ्यांची बाजू मांडल्याने ठाणे शहरासह राज्यातील सुमारे ५० हजार सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
औरंगाबाद खंडपीठाने याबाबत दिलेल्या निर्णयामुळे सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी फक्त अनुसूचित जाती वर्गातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळत होता. त्यामुळे इतर वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले होते. ठाणे महापालिकेतही असे अनेक कर्मचारी लाभापासून वंचित राहिले आहेत. जो सफाईचे काम करतो, तो सफाई कर्मचारी अशी ठाम भूमिका मांडत आमदार संजय केळकर यांनी तब्बल सहा विधिमंडळ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. तसेच याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती.
सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळावा, अशी शिफारस लाड-पागे समितीच्या अहवालात करण्यात आली होती. तीच भूमिका राज्य सरकारची होती. अन्य संघटनांनीही याबाबत प्रयत्न सुरू ठेवले होते. औरंगाबाद खंडपीठाकडे सुरू असलेल्या प्रकरणात राज्य शासनानेही बाजू लावून धरली होती. अखेर ८ जानेवारी रोजी खंडपीठाने सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा, असा निर्णय दिला. तसा आदेश शुक्रवारी कळवण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
या निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील वंचित सफाई कामगारांना न्याय मिळाला असून त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सफाई कामगार हा स्वच्छता दूत असून त्यांच्यात भेदाभेद नसावा. जो घाणीत सफाईचे काम करतो, तो सफाई कामगार आहे. त्यामुळे अशा सर्वच सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा, अशी माझी भूमिका होती. त्यासाठी विधिमंडळातून सातत्याने आवाज उठवला. नुकत्याच आलेल्या निकालाने या कामगारांना न्याय मिळाला, याबाबत मी राज्य सरकारचे आणि प्रयत्न करणाऱ्या संघटनांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली.
ML/ML/SL
11 Jan. 2025