रायगड जिल्ह्यात राबवली जाणार बांबू क्लस्टर योजना
अलिबाग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अधिक उत्पादन मिळवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या दोन्ही उद्देशानी कोकणात पारंपारिक पिक पद्धती बरोबरच नवीन कृषी उत्पादने घेतली जात आहेत. रायगड जिल्ह्यात बांबू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या उपक्रमा अंतर्गत यंदा ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. कृषी, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने यासाठी रोपवाटीका तयार केल्या असून, लवकरच या रोपांची लागवड केली जाणार आहे. किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी या बांबूंची मदत होऊ शकणार आहे. त्याच बरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरणार आहे.
जिल्ह्यात १ कोटी बांबू लागवडीची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. या योजने अंतर्गत यावर्षी ३५ लाख बांबूची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी रोप तयार करण्यात आली असून, लवकरच या वृक्षांची लागवड सुरू केली जाणार आहे. खाजगी आणि शासकीय जमिनींवर ही लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांना पडीक जमीनी, बांधावर बांबू लागवड करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
बाबूंची लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल. त्याच बरोबार शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास त्यांना जोड उत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येनी राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे बांबू जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकेल. किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड…
पडीक जमिन, ई क्लास जमिन, गायरान जमिन, गावठान जमिन, जलसंपदा व मृद व जलसंधारण विभागाच्या धरणाच्या बाजोला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाने रस्त्याकरीता अधिग्रहीत केलेली जमीन व इतर कोणतेही शासकीय जमीनीवर बांबू लागवड करण्यात येणार आहे. बांबू क्लस्टर योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे.
शेतकऱ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. वैयक्तिक बांबू लागवडी अंतर्गत ३ मीटर बाय ३ मीटर या अंतरानुसार १ हेक्टरमध्ये ११०० रोपांची लागवड केल्यास ३ वर्षापर्यंतच्या कालावधीत लाभार्थी यांना एकूण ७ लाख रक्कमेपर्यंतचा लाभ मजुरी व इतर खर्चाच्या स्वरुपात दिले जाणार आहे. तीन वर्षानंतर शेतकऱ्याला बांबूचे उत्पादन मिळण्यास सुरूवात होणार आहे.
SL/ML/SL
10 Jan. 2025