धारावी सोशल मिशनच्या पहिल्या ‘संसाधन केंद्रा’ चे लोकार्पण
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगर मुंबईच्या मध्यभागी वसलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासासाठी आता वेगाने पावले उचलली जात आहेत. धारावीकरांना मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) वतीने धारावीत पहिल्यावहिल्या ‘संसाधन केंद्रा’चे लोकार्पण नुकतेच करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास या विविध पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न केले जाणार असून, धारावीकरांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणाऱ्या प्रवासाची ही पहिली पायरी ठरेल, असा विश्वास डीएसएमच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
धारावीतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीने आणि जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी झटणाऱ्या युवकांची अनेक उदाहरणे आहेत. संसाधन केंद्राच्या माध्यमातून अशा तरुणांना सहजतेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या केंद्राच्या माध्यमातून धारावीकरांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करण्याचा डीएसएमचा मानस आहे.
धारावी सोशल मिशनची स्थापना जून 2024 मध्ये झाली असून तेव्हापासून आजपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन डीएसएमच्या वतीने करण्यात आले आहे. धारावीकरांशी आपली नाळ घट्ट करत त्यांच्या उज्वल आणि आत्मसन्मानपूर्ण भविष्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ( पूर्वीचे डीआरपीपीएल) यांनी केली होती. संशोधन केंद्र हे या कटिबद्धतेची प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने सुरू झालेली वाटचाल आहे.
सुमारे 12 लाख लोकांना आश्रय देणाऱ्या धारावीत कोणताही उपक्रम हा पुरेसा पडणार नाही. पण तरीही, उज्वल भविष्यासाठी सर्वांना समान संधी देण्याच्या हेतूने कुठूनतरी सुरुवात करणे आवश्यक आहे. डीएसएमची यशस्वी वाटचाल ही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. “लोक विकास उपक्रमातून धारावीतील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना सुमारे 10 कोटी रुपयांच्या मोफत शासकीय आरोग्य सुविधांचा फायदा करून देण्यात आला. रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, तर सुमारे 200 रहिवाशांना विविध प्रकारच्या 177 शासकीय योजनांमधून थेट फायदा मिळाला. सुमारे 200 धारावीकरांना विविध प्रकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी करून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सुमारे 200 रहिवाशांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला” अशी माहिती धारावी सोशल मिशनच्या प्रवक्त्याने दिली.
SL/ML/SL
10 Jan. 2025