लॉस एंजेलिसमध्ये जंगलात भीषण आग, ३ लाख लोकांचे स्थानांतर
लॉस एंजेलिस, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवूडसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेली आग शहरापर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 4 हजार 856 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आगीत सुमारे 1100 इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून 28 हजार घरांचे नुकसान झाले आहे. आता जंगलात पसरलेल्या आगीमुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 50 हजार लोकांना तत्काळ घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शहरात आणीबाणी जाहीर केली आहे.
लॉस एंजेलिस शहरातील अति श्रीमंतांचे वास्तव्य असलेल्या पॅलिसेड्समधील अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगले या आगीत जळून खाक झाले आहेत. मार्क हॅमिल, पॅरिस हिल्टन, जेमी ली कर्टिस, मँडी मूर, मारिया श्राइव्हर, ॲश्टन कुचर, जेम्स वुड्स आणि लीटन मीस्टर यांच्यासह अनेक हॉलीवूड स्टार्सच्या घरांना आग लागली आहे. अनेक सेलिब्रिटींना घर सोडावे लागले आहे.
आगीमुळे लॉस एंजेलिसमधील ब्रेटनवूड भागातील उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉस एंजेलिस ही अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला काउंटी आहे. येथे 1 कोटीहून अधिक लोक राहतात. येथील फिल्म इंडस्ट्रीला प्रसिद्ध हॉलिवूडचे नाव देण्यात आले आहे.
SL/ML/SL
9 Jan. 2025