अनिवासी भारतीय दिवस : परभूमीतही भारताची पताका उंच फडकवणाऱ्या भरातीयांचा सन्मान

मुंबई, दि. 8 (राधिका अघोर) : व्यवसाय, नोकरीच्या अधिक चांगल्या संधी तसेच इतर कारणांसाठी आपला देश सोडून, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचं मन मात्र अनेकदा स्वदेशातच रेंगाळत असतं. भारताबाहेर असले, तरीही आर्थिक आणि इतर स्वरूपाचं योगदान हे अनिवासी भारतीय देतच असतात. अशाच अनिवासी भारतीयांचं संमेलन दरवर्षी ९ जानेवारीला भरवलं जातं. जगाच्या पटलावर विशेष उल्लेखनीय कार्य करत, भारताची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या भारतीयांचा ‘अनिवासी भारतीय पुरस्कार देऊन, सन्मानही केला जातो.
याच दिवशी, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते. भारताची वेगळी ओळख निर्माण करून, अहिंसा आणि सत्याची शिकवण जगाला सांगणारे आणि असहकाराचं प्रभावी शस्त्र जगाला देणाऱ्या ह्या महात्म्याच्या गौरवार्थ, हाच दिवस अनिवासी भारतीय दिवस म्हणून निवडला गेला. एका अर्थानं, गांधीजींचा वारसा पुढे नेण्याचा उद्देशही त्यातून अधोरेखित करण्यात आला. पहिला अनिवासी भारतीय दिवस, ८-९ जानेवारी २००३ रोजी नवी दिल्लीत साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी हे संमेलन साजरं केलं जातं.
यंदा अनिवासी भारतीय संमेलन ओडिशा इथं ८ आणि ९ जानेवारीला होणार आहे. यावर्षी, २७ अनिवासी भारतीयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या प्रो. अजय राणे यांची सामुदायिक सेवा श्रेणीत, तर सिंगापूरचे अतुल टेंबुर्णीकर यांची, शिक्षण क्षेत्रातल्या कामाबद्दल, पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या सगळ्यांनी त्या त्या देशात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामे करत, भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे.
तसाही गेल्या दहा वर्षात भारताचा दबदबा जगात वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे भारताच्या मताला किंमत आली आहे. आर्थिक क्षेत्रात तर आपण सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहोतच; त्याशिवाय संस्कृती, कला, क्रीडा, योग, ध्यानधारणा अशा आपल्या सुप्त शक्तिंकडेही जग आकर्षित होत आहे. आणि ही सुप्त शक्ती अधिक वाढवण्याचे, जगाला त्याकडे वळवण्याचे काम आपले अनिवासी भारतीय करत असतात. आज जगात कदाचित असा एकही देश नसेल जिथे भारतीय व्यक्ती नाही. ते जिथे राहतात तिथली संस्कृती तर स्वीकारताताच, शिवाय त्या देशाला भारताची ओळख करून देतात.
भारतीय लोक गेल्या अनेक वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत, आफ्रिका आणि आशियातील काही देशांशी तर भारताचे 3000 वर्षापासूनचे संबंध आहेत. भारताबाहेर विखुरलेल्या या शक्तीला संघटित करणारा, एक मूर्त स्वरूप देणारा उपक्रम म्हणजे, ‘अनिवासी भारतीय दिन’ आणि त्या निमित्ताने होणारे संमेलन !
हे संमेलन आयोजित करण्यामागची महत्वाची उद्दिष्टे म्हणजे, व्यवसायानिमित्त भारताच्या बाहेर, परदेशात राहणाऱ्या आपल्या बांधवांना भारताविषयीच्या त्यांच्या भावना व्यक्त करता याव्यात, आपल्या देशबांधवांशी संवाद साधता यावा, यासाठी हे संमेलन त्यांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. भारतीयांना अनिवासी भारतीयांच्या यशोगाथा यामुळे कळतात, देशाच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, ते त्यांना कळतं.
त्याशिवाय जगभरातल्या 100 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या अनिवासी भारतीयांचे एक विस्तीर्ण जाळे तयार करणे. भारताचे इतर देशांशी असलेले संबंध, अधिक दृढ करण्यासाठी, हे अनिवासी भारतीय एक सुप्तशक्ती (soft power) म्हणून काम करतात. भारताच्या युवा पिढीला, अनिवासी भारतीयांशी जोडले जाऊ शकते. तसेच, अनेक देशात भारतीय लोक श्रमिक, कामगार म्हणून काम करतात, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात देखील अनिवासी भारतीय लोक मदत करू शकतात. विशेषत: आशियाई देशात मानवी तस्करी, अमली पदार्थांची तस्करी अशा संकटात अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची योजना देखील या संमेलनात बनविली जाऊ शकते.
भारताची वसुधैव कुटुंबकम संकल्पना प्रत्यक्षात साकरण्यात अनिवासी भारतीय मोठी भूमिका बजावत आहेत.
ML/ML/PGB 8 Jan 2025