HMPV Virus चा असा करा सामना, घ्या ही काळजी

कोरोनाच्या विळख्यातून जग आता सावरत असतानाच पुन्हा नवे संकट आले आहे. चीनमधल्या एचएमपीव्ही नावाच्या विषाणूमुळे (HMPV Virus) नवी चिंता निर्माण झाली आहे. चीनमध्ये नागरिकांना या विषाणूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. हा विषाणू करोनाइतका जीवघेणा नसल्याचं आरोग्यविषयक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तरीही पुरेशी काळजी घेऊन या नव्या आव्हानाला तोंड देणे गरजेचे आहे. मात्र, लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांना याची लवकर लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV Virus) ची लक्षणं ही सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखी असतात.
खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे ही सामान्य लक्षण आहेत. मात्र, ब्रॉन्कायलाइटिस (फुप्फुसांचा संसर्ग) आणि दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. काहीवेळा श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. महत्वाचं म्हणजे एचएमपीव्ही व्हायरसवर सध्या कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल उपचार उपलब्ध नाहीत. बरेच लोक विश्रांती आणि हायड्रेशनने बरे होतात मात्र, खोकताना, शिंकताना तोंड, नाकावर रूमाल धरलात, साबण किंवा सॅनिटायझरने हात वारंवार स्वच्छ धुतलेत, ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळलेत, सकस अन्न खाल्लेत, गरम पाणी प्यायलेत, सुरक्षित अंतर ठेवलेत व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केलेत तर तर या आजारापासून तुमचे रक्षण होऊ शकते. तसेच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतीही औषध घेणे टाळावे.