या कालावधीत मुंबईत होणार Third Eye Asian Film Festival

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
आठ मराठी चित्रपट दाखवले जाणार
आशा (दिग्दर्शक दीपक पाटील), सिनेमॅन (दिग्दर्शक उमेश बगाडे), कर्मयोगी आबासाहेब (दिग्दर्शक अल्ताफ शेख ), जिप्सी (दिग्दर्शक शशी खंदारे), भेरा (दिग्दर्शक श्रीकांत भिडे), मॅजिक (दिग्दर्शक रवी करमरकर), मंडळ आभारी आहे (दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक), छबिला (दिग्दर्शक अनिल भालेराव) यांचा या स्पर्धा विभागात समावेश करण्यात आला आहे.
थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाच्या २१ व्या आवृत्तीत आशियाई स्पेक्ट्रम विभागात चीन, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, कझाकिस्तान, ट्युनिशिया, जपान, इराण, साउथ कोरिया आणि श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे आणि साउथ कोरिया मधील सहा चित्रपट कंट्री फोकस विभागात दाखवले जातील.
परदेशातील विशेषत: हॉलिवूड आणि युरोपमधील चित्रपट भारतीय प्रेक्षकांना पहाण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले आहेत . पण त्याच वेळी जागतिक स्तरावर गाजत असलेले आशियाई चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये लोकप्रिय असलेले हे चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना दाखविण्याच्या उद्देशाने एशियन फिल्म फाऊंडेशनने थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन सुरू केले. पहिला महोत्सव ३ ऑगस्ट २००२ रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या वीस वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव मुंबईत आयोजित केला जात आहे.
SL/ML/SL
30 Dec. 2024