ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार

 ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार

पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गदिमा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार, तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगूळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसिद्ध कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार क्षितीज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रबन पुरस्कार, तर प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांना विद्या प्रज्ञा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे आणि शिवराम कोल्हटकर उपस्थित होते. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या गदिमा स्मृती समारोहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नाटककार श्रीनिवास भणगे उपस्थित राहणार आहेत. एकवीस हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे.

अकरा हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गृहिणी सखी सचिव या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर पाच हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे चैत्रबन आणि विद्या प्रज्ञा पुरस्कारांचे स्वरूप आहे. या सोहळ्यानिमित्त गदिमांचे निकटवर्ती स्नेही आणि महाराष्ट्राचे नामवंत भाषा आणि शिक्षणतज्ञ ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या उत्तरार्धात गदिमांचे कनिष्ठ बंधू डॉ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ, गदिमा पुरस्कार विजेत्या आशा काळे यांच्या आवडीच्या “गदिमा गीतांचा” खास कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन गदिमा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

ML/ML/SL

29 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *