या देशाकडून १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियाच्या अती वापरामुळे लहान मुलांवर होणाऱ्या विपरित परिणामांबाबत जगभर चर्चा सुरु असते. मात्र याच्या वापरावर नियमन ठेवणारा ठोस धोरण मात्र याआधी जाहीर झाले नव्हते. मात्र आता ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घालणारे विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. या विधेयकावर अंतिम मोहोर उमटवण्याची जबाबदारी आता सिनेटवर आहे. या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यास अल्पवयीन मुलांना सोशल मीडियापासून रोखणारा हा जगभरातील पहिलाच कायदा ठरेल. देशातील प्रमुख पक्षांचाही विधेयकाला पाठिंबा आहे त्यामुळे हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर होण्याची खात्री निर्माण झाली आहे. मात्र सरकार किंवा विरोधी पक्षाशी संलग्न नसलेल्या खासदारांकडून चर्चेदरम्यान विधेयकावर सर्वाधिक टीका देखील करण्यात आली आहे
टिकटॉक, फेसबुक, स्नॅपचॅट, रेड्डिट, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया मंचांवर लहान मुलांना खाती उघडण्यापासून रोखण्यात अपयश आल्यास या माध्यमांना पाच कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर (तीन कोटी ३० लाख अमेरिकी डॉलर)पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. या आठवड्यात विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास दंड लागू होण्यापूर्वी वयोमर्यादेच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी सोशल मीडिया मंचांकडे एक वर्षाचा कालावधी असेल
सरकारने जारी केलेले पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तसेच अन्य ओळखपत्रे देण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना सक्ती करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ही माध्यमेही सरकारी यंत्रणेद्वारे डिजिटल ओळखीची मागणी करू शकणार नाहीत, अशी विरोधी पक्षाचे खासदार डॅन तेहान यांची माहिती.
हा कायदा परिपूर्ण असेल का? नाही. परंतु कोणताही कायदा परिपूर्ण आहे का? नाही. परंतु या कायद्याने जर काही मदत अगदी थोड्या प्रमाणात का होईना झाल्यास नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडेल. असे- विरोधी पक्षाचे खासदार डॅन तेहान यांनी म्हटले आहे.
तर या बंदीमुळे मुले एकाकी होतील, सोशल मीडियाच्या सकारात्मक पैलूंपासून वंचित होतील, मुले घातक वेबसाइटकडे ओढले जातील, लहान मुलांना भेडसावणाऱ्या घातक बाबी कळण्यापासून ते वंचित राहतील आणि ऑनलाइन मंच अधिक सुरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळणार नाही. असेही आक्षेप काही प्रतिनिधींकडून नोंदवण्यात आले आहेत.
SL/ML/SL
29 Nov. 2024