मुख्यमंत्री ठरला, खातेवाटपावरून अडले नवीन सरकारचे घोडे
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती किती एकसंध आहे आणि त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत अशा प्रकारच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी काल रात्री दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला असला तरी आपल्यालाच महत्त्वाची खाती मिळावी यासाठी तिन्ही पक्षांचे नेते अडून बसल्याने खाते वाटपावरून आता राज्यातल्या नवीन सरकारचे घोडे अडले आहे असे स्पष्ट झाले आहे .
काल रात्री दिल्लीत अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या समवेत एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बरीच खलबते झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करण्याचे निश्चितही झाले मात्र आपण मुख्यमंत्री पद सोडत असल्याने आपल्याला गृह आणि तत्सम महत्त्वाची खाती मिळावीत असा दावा एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत केल्याचे समजते त्यासोबतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री
पदासोबतच अर्थ खातेही मिळावे असा आग्रह धरला आहे. मात्र भाजपा ही दोन्ही खाती सहकारी पक्षांना देण्यास तयार नाही त्यामुळे या दोन खात्यांसोबतच अन्य काही खात्यांवरून कोणताही निर्णय न झाल्याने नव्या सरकारचा शपथविधी रखडला आहे. याच दरम्यान आज दिवसभर समाज माध्यमावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी ठरले असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
काल रात्री बैठकीनंतर सर्व चर्चा सकारात्मक झाली असून आणखी दोन दिवसानंतर पुन्हा राज्यात बैठक होऊन त्यात पुढील धोरण निश्चित केले जाईल असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितले आणि त्यानंतर ते त्यांच्या सातारा जिल्ह्यातल्या दरे या त्यांच्या मूळ गावी निघून गेले आहेत. यामुळे शिंदे हे नाराज असल्याच्या देखील चर्चा झाल्या मात्र त्यांची तब्येत ठीक नसल्याने ते आरामासाठी गेले आहेत असे त्यांच्या वतीने उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नवीन सरकारमध्ये फडणवीस यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील असतील आणि त्यापैकी प्रत्येकी एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा असेल असे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असतील मात्र शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे हे पद स्वीकारायला तयार नसल्याचे समजते , तरीही त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी शिंदे यांनी मंत्रिमंडळात रहावे असा आग्रह धरला आहे .
235 जागा इतके प्रचंड बहुमत मिळून देखील निवडणूक निकालानंतर तब्बल सहा दिवस उलटून गेल्यावरही राज्याला अद्याप नवीन सरकार पाहायला मिळालेले नाही. इतके मजबूत बहुमत दिल्यानंतरही खाते वाटपावरून महायुतीचे घोडे अडलेले दिसत असले तरी याचा परिणाम त्यांना निवडून दिलेल्या जनतेच्या मनावर काय होईल याचा विचार या तिन्ही पक्षांनी करायला हवा असे राजकीय निरीक्षकांना वाटते . या सगळ्यादरम्यान आता 5 डिसेंबर हा सत्ता स्थापनेचा म्हणजेच शपथविधीचा नवीन मुहूर्त समोर आला आहे.
ML/ML/SL
29 Nov. 2024