प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

 प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर यांचे निधन

पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून आपल्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक मुकुंद फणसळकर यांचं निधन झालं आहे. गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती दिली आहे. मित्राच्या जाण्याने सलील यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्या निधनाची माहिती देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते भावुक झाले आहेत. त्यांनी मुकुंद यांचा फोटो शेअर करत लिहिलंय, “मुकुंद फणसळकर गेला. अतिशय आवडता गायक. एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा.आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने. बोलण्याने भारावून टाकलं होतं.त्यातलं एक महत्त्वाचं नाव. खूप खूप वाईट वाटलं. प्रीतरंग , साजणवेळा, नॅास्टॅस्जिया सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या. एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली.”

मुकुंद यांच्यासोबतच करिअरची सुरुवात करणाऱ्या त्यागराज खाडिलकर यांनीही त्यांच्यासाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यागराज यांनी लिहिले आहे की, ‘आणि आज तो गेला. मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम… रसिकांनी आम्हा दोघांनाही उमेदीचे तरुण गायक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं! त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती, यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या सदैव स्मरणात राहशील मित्रा… आमच्या स्मरण यात्रेत!’

SL/ML/SL

19 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *