स्पेनच्या नागरिकांनी राजा-राणींवर केली चिखलफेक

मद्रीद,4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपातील काही देशांमध्ये नामधारी स्वरूपात राजेशाही शिल्लक आहे. येथील जागरुक नागरिक राजघराण्यातील व्यक्तींना योग्य तो मान देतात मात्र वेळप्रसंगी त्यांना जाबही विचारतात. देशाप्रती त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतात. स्पेनमधील पूरग्रस्त व्हॅलन्सिया भागाला भेट देण्यासाठी आलेले राजा फिलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिजिया यांच्यावर संतप्त नागरिकांनी चिखल फेकला आहे. पूर रोखण्यात अपयशी ठरल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी किलर आणि शेम ऑन यू अशा घोषणा दिल्या. राजा फिलीप यांच्यासोबत स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझही उपस्थित होते. त्यांच्या गाडीवरही लोकांनी हल्ला केला.पूर रोखण्यासाठी सरकारने आधीच उपाययोजना का केल्या नाहीत,असा सवाल नागरिकांनी सांचेझ यांना विचारला.
नागरिकांनी पंतप्रधान सांचेझ यांच्या गाडीवर हल्ला करताच त्यांचे सुरक्षा रक्षक पुढे सरसावले. यावेळी झालेल्या हाणामारीत दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. या प्रकारामुळे राजा-राणी आणि पंतप्रधानांना आपला दौरा अर्धवट सोडून राजधानीला परतावे लागले.स्पेनमध्ये पुरामुळे हाहाःकार माजला असून आतपर्यंत पुरामुळे २१७ जणांचा बळी गेला आहे. अवघ्या आठ तासांत वर्षभराएवढा पाऊस झाल्याने स्पेनमध्ये पुराने पन्नास वर्षांचा विक्रम मोडला. मुसळधार पावसाने अचानक पूर आला. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची संधीही मिळाली नाही.
SL/ML/SL
4 Oct. 2024