साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक दिवाळी पाडवा स्नेहमीलन आणि नातेसंबंध मधुर करणारा सण
-राधिका अघोर
दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा पाडवा- अमावस्येच्या लक्ष्मीपूजनानंतर, अश्विन महिना संपून कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलीप्रतिपदेलाच दिवाळी पाडवा म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अर्धा मानला जातो. बळीराजाविषयी पुराणात एक रंजक कथा आहे. हा अत्यंत पराक्रमी राजा होऊन गेला, आपल्या पराक्रमाने त्याने पृथ्वीसह स्वर्गातील इंद्राचे राज्यही बळकावले होते. हा राजा अत्यंत सुखासीन वृत्तीचा, मात्र तेवढाच उदार होता असे म्हणत. आपल्या औदार्यवृत्तीमुळे, त्याच्याकडे आलेला कोणीही याचक विन्मुख परत जात नसे, अशी या राजाची कीर्ती होती. त्याच्या ह्या वृत्तीचा अनेक लोक गैरफायदाही घेत, त्यामुळे अनेकदा सत्पात्री दान न होता, संपत्तीची नासधूस होत असे. त्याने स्वर्गाचे राज्यही बळकावल्यामुळे देवांना चिंता वाटू लागली होती.राजाच्या ह्या वृत्तीला आळा घालण्यासाठी श्री विष्णूने बटू वामनाचे रूप घेतले आणि बळीराजाकडे दान मागितले. केवळ तीन पावले भूमी मला दे, अशी मागणी वामनाने केली. राजाने ती देण्याचे वचन दिले. बटू वामनाने एका पावलात संपूर्ण पृथ्वी तर दुसऱ्या पावलात आकाश पादाक्रांत केले. आता तिसरे पाऊल टाकायला जागाच उरली नव्हती, बळीराजा मात्र आपल्या वचनाचा पक्का होता. त्याने, वामनाला तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेवायला सांगितले. वामनाने त्यावर पाय ठेवून बळीराजाला पाताळात गाडले. बळीराजाचे राज्य तर संपुष्टात आले, मात्र त्याची दानशूर वृत्ती बघून, विष्णू म्हणजेच वामनाने त्याला एक इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला. त्यावेळी, पृथ्वीवर वर्षातून तीन दिवस तरी माझे राज्य असू दे, असा वर बळीराजाने मागितला. हा वर वामनाने मान्य केला. हे तीन दिवस म्हणजे, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा, असे म्हटले जाते. म्हणून ह्या दिवाळीच्या तीन दिवसांत, सगळीकडे झगमगाट, आनंद, उत्साह आणि भौतिक सुखांची रेलचेल असते.बळीराजाचे स्मरण केले जाते.
काही ठिकाणी शेणाचे बळीराजा करण्याची ही पद्धत असते. त्यांची अंगणात पूजा केली जाते. तर उत्तर भारतात, विशेषतः मथुरा, वृंदावन परिसरात गोधनाची पूजा केली जाते. पाडवा साडेतीन मुगूर्तापैकी एक मुहूर्त ही मानला जातो. त्यामुळे या दिवसापासून किंवा या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते. दिवाळी म्हणजे विरंगुळा, कुटूंब, मित्र परिवारासोबत छान वेळ घालवणे. शिस्त आणि कष्टाचे जगणे काही दिवस बाजूला ठेवून थोडासा वेळ आपल्या कुटुंबियांसोबत, सुखात- आळसात घालवणे, ह्या आनंदातून पुन्हा नवी ऊर्जा घेऊन जोमाने कामाला लागणे, हा दिवाळीचा खरा हेतू ! बलीप्रतिपदेपासूनच मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होतो. महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीला आणि पित्याला ओवाळतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात.
आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन केल्यानंतर आजपासून व्यापारी वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता इत्यादी वाहून त्यांची पूजा होते.दिवाळी पाडव्याच्या सर्वाँना शुभेच्छा !!