एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालकपदी मराठी व्यक्ती

 एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालकपदी मराठी व्यक्ती

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेजस या लढाऊ विमानांच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या भारत सरकारच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या (ADA) महासंचालक पदी जितेंद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे लढाऊ विमान विभागाच्या कार्यक्रम संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करण्यामध्ये जाधव यांनी आजवर महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.

जितेंद्र जाधव यांनी काल ११ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला असून अडव्हान्स मिडियम कोम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA) प्रकल्पाला गती देणे आणि २०२५ च्या चौथ्या तिमाहीपर्यंत एमके-२ लढाऊ विमान तयार करण्याचे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. जितेंद्र जाधव यांनी १९८७ मध्ये पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्सची पदवी मिळविली. लढाऊ विमान निर्मिती, नागरी वाहतूक विमान निर्मिती, वैमानिक प्रशिक्षण या कामाचा ३७ वर्षांचा अनुभव आहे. याबरोबरच तेजस लढाऊ विमानात शस्त्रास्त्र बसविणे, तांत्रिक विकास, डिस्प्ले संगणक आणि डिजिटल शस्त्रास्त्र व्यवस्थापन प्रणाली सारखे तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाधव यांचे २० हून अधिक शोधनिबंध विविध प्रकाशनामध्ये छापून आलेले आहेत.

हलक्या वजनाची लढाऊ विमान निर्मिती (Light Combat Aircraft – LCA) हा भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून बंगळुरूस्थित असलेल्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीकडे त्याची प्रमुख जबाबदारी आहे. एडीएचे मुख्यालय बंगळुरू येथे असून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही संस्था एडीएची प्रमुख भागीदार आहे.

SL/ML/SL

13 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *