राष्ट्रीय अंतराळ दिन : चांद तारो को छुने की आशा…..
मुंबई, दि. 23 (राधिका अघोर) :भारताच्या चांद्रयान या ऐतिहासिक मोहिमेचे यश संस्मरणीय करण्यासाठी आणि देशाच्या एकूणच अंतराळ विषयक प्रगतीचा गौरव करण्यासाठी 23 ऑगस्ट हा दिवस ‘ राष्ट्रीय अंतराळ दिन ‘ म्हणून साजरा केला जाणार आहे. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची घोषणा केली होती आणि आज संपूर्ण भारतात पाहिलाच अंतराळ दिन साजरा होत आहे.
एकेकाळी गारुडी, साप आणि हत्तींचा देश म्हणून हिणवल्या जाणाऱ्या भारताला खरं तर खगोलशास्त्राच्या अध्ययनाचा हजारो वर्षांचा प्राचीन वारसा आहे. मात्र देश पारतंत्र्यात गेला आणि त्याकाळात ज्ञान विज्ञानाच्या उज्ज्वल परंपरेला जणू ग्रहण लागलं. मात्र भारतीयांची संशोधक वृत्ती तीच होती, जिद्द ही होती. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय वैज्ञानिकांनी आपली खगोल शास्त्र अध्ययनाची परंपरा पुनरुज्जीवित केली. स्वतंत्र भारतात त्याला यशावकाश प्रोत्साहन ही मिळाले आणि सायकल वरून पहिले रॉकेट नेणारे ए पी जे अब्दुल कलाम पासून ते आज ऑटोरिक्षा च्या खर्चात मंगळावर स्वारी करणाऱ्या इसरो च्या प्रवासाचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.
गेल्या 70 वर्षात तुटपुंजी साधने आणि अल्प आर्थिक मदतीच्या बळावर भारताच्या खगोल वैज्ञानिकांनी जी नेत्रदीपक प्रगती केली आहे, त्यामागे त्यांची जिद्द आणि विलक्षण बुद्धिमत्ता, विज्ञान वृत्ती हीच प्रेरणा आहे.
आज आपल्या महत्त्वाकांक्षाना क्षितिजाचेही बंधन नाही. चांद्रयान हा एक ऐतिहासिक टप्पा असला तरीही तो स्वल्प विराम होता. त्या पाठोपाठ आपण 2 सप्टेंबर 2023 आदित्य L-1 या अवकाश वेधशाळेचे प्रक्षेपण केलं. आणि आता २०३५ पर्यंत स्वतःचे अवकाश स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे.
चांद्रयान 4 आणि पाच ह्या मोहिमा लवकरच आखल्या जाणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून मिशन गगनयानवर काम सुरू आहे. या मिशनअंतर्गत भारत, २०२५ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. आपल्या पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना आहे – चंद्राला स्पर्श करत मानवी आयुष्यातही परिवर्तन: भारताचे अवकाश धोरण. अनेकांना असं वाटतं की अंतराळात यानं पाठवून काय होणार आहे? देशातल्या समस्या सोडवण्यात त्याचा काय उपयोग? हे त्यांचे अज्ञान असते. आणि हे अज्ञान दूर करणे हाच या संकल्पनेचा उद्देश आहे.
खरं तर खगोल विज्ञान, उपग्रह, यान या सगळ्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी जवळचा आणि महत्वाचा संबंध असतो. मात्र त्याबद्दल जनजागृती नसल्याने अनेकांना त्याची जाणीव नसते. पावसाचा अंदाज, भूमीची सुपिकता अशा गोष्टींपासून ते आपण रोज वापरत असलेली जी पी एस सेवा देखील या खगोल विज्ञानाचीच देणगी आहे. त्याशिवाय देशाची सुरक्षा, हवामान यांच्याशीही या उपग्रहांचा महत्वाचा संबंध असतो.
राष्ट्रीय अंतराळ दिनाचा हेतूच, विज्ञानविषयी प्रचार प्रसार आणि जनजागृती करणे असा असून त्यातून भविष्यात अधिकाधिक वैज्ञानिक वृत्तीचे युवा घडवणे शक्य होणार आहे.
ML/ML/PGB 22 Aug 2024