सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ, वर्षभरात DRI कडून ३५०० कोटींचे सोने जप्त
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्याच्या भाव गगनाला भिडल्यामुळे सोन्याच्या तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ( DRI ) ने यंदा देशभरात वर्षभरात सोने आणि अंमलीपदार्थांच्या मोठ्या कन्साईन्मेंट पकडल्या आहेत. देशभरात संपलेल्या 2023 – 2024 आर्थिक वर्षांत तब्बल 3,500 कोटीचं सोनं आणि अंमली पदार्थ जप्त केल्याचे महसूल गुप्तचर संचालनालयाचे प्रधान महासंचालक मोहन कुमार सिंह यांनी स्पष्ट केले आहे. सोन्याचे भाव प्रचंड वाढल्याने सोनं स्मगलिंग करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोन्याच्या किंमतीत तीव्र वाढ होत असताना सरकारने लावलेले 15 टक्के आयात शुल्क चुकवण्यासाठी सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे सोने आयात करणाऱ्यावर असलेल्या कमी कराचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी सोन्याची प्रचंड आयात केल्याने सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे दागिने आणि सुट्या भागांच्या आयात निर्बंध लादले आहेत. भारत सरकारच्या एकूण सोने आयात करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे एप्रिलमध्ये वस्तू व्यापार तूट 19.1 अब्ज डॉलरवर गेली होती. ती पाच महिन्यांतील सर्वाधिक उच्चांकावर पोहोचली आहे. सोने आयातीचे प्रमाणात 208.99 टक्क्यांची तीव्र वाढ होत ते गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात 1 अब्ज डॉलर होते ते या एप्रिल महिन्यांत 3.11 अब्ज डॉलरवर पोहचले आहे.
सरासरी रोज दोन केसेस
या आर्थिक वर्षात ( मार्च – एप्रिल 2023-24 ) महसूल गुप्तचर संचालनालयाने या प्रकरणात देशभरात एकूण 623 केसेस नोंदविल्या आहेत. म्हणजे वर्षाला सरासरी दोन केस असे हे प्रमाण असून त्यातून 3,500 कोटी रुपयाचं सोनं आणि अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यात अंमली पदार्थ तसेच सायकोट्रॉपिक पदार्थ आणि जप्त केलेल्या सोन्याचा समावेश आहे. यात महागड्या सिगारेट्स, बनावट नोटा, वन्यजीव पदार्थ, सुपारी काजू आणि रक्तचंदनाचा समावेश देखील असल्याचे महसुल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे.
SL/ML/SL
24 June 2024