तुळजाभवानी देवीचे सिंहासन आणि गाभारा होणार सोन्याचा
तुळजापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी मंदिर संस्थाने तुळजाभवानी मंदिराची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला असून नवीन गाभारा उभारण्यात येणार आहे. यात सोने व चांदीचा उपयोग केला जाणार आहे. सिंहासनालाही सोने व चांदीचा मुलामा देण्याचा प्रस्ताव आहे. पुरातत्व विभागाचे मार्गदर्शन सल्ल्यानुसार हे बदल केले जातील.
पुरातत्व विभागाच्या मदतीने तुळजाभवानी मंदिरातील जुन्या बांधकामाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तडे गेलेले दगडी खांब काढून नवीन खांब बसवण्यात येतील. मात्र, मंदिराचा मूळ पोत बिघडणार नाही याची काळजी घेतली जाईल. यासाठी ५५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सांगितले की मंदिराची रचना खूप वर्षांपूर्वी करण्यात आली होती. यामुळे मंदिराच्या बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग नाही. आतमध्ये येण्यासाठी सुद्धा मुख्य प्रवेशद्वारातूनच पारंपारिक पद्धतीने प्रवेश देण्याची मागणी होत आहे. या बाबीला अनुसरून मंदिरामध्ये बाहेर पडण्यासाठी मार्गाची रचना करण्यात येणार आहे.
ML/ML/SL
19 June 2024