घोडबंदर किल्ल्यात सापडले तळघर?

 घोडबंदर किल्ल्यात सापडले तळघर?

ठाणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर येथील किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, यादरम्यान प्रवेशद्वाराच्या कमानीसाठी खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी छोटे तळघरसदृश बांधकाम आढळले आहे. हे भुयार असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याबाबत पुरातत्त्व विभागाला कळवण्यात आले असून संबधित अधिकारी आल्यावर या रहस्याचा उलगडा होणार आहे.

शासनाच्या संरक्षित स्मारक योजनेनुसार मिरा-भाईंदर महापालिकेला घोडबंदर किल्ला देखभाल , दुरुस्ती आणि सुशोभिकरण यासाठी
दत्तक देण्यात आला आहे. १४ कोटी रुपये खर्चून किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात येत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कमानीसाठी खोदकाम सुरू असताना काही तळघर आणि बाजूला गवाक्ष दिसून आले आहे. या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग निघत असावा असा अंदाज यामुळे व्यक्त केला जात आहे .

याबाबत पालिकेने पुरातत्त्व विभागाला कळवले आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मंगळवारी येथे पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्या वेळी हे भुयार आहे की अन्य काही, याचा उलगडा होणार आहे. या किल्ल्यावर आक्रमण झाल्यास सुरक्षित बाहेर जाण्यासाठी त्या काळी भुयार बनविले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे यावर संशोधन झाल्यास अनेक बाजूंवर प्रकाश पडणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

ML/ML/PGB 17 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *