नाशिकमध्ये swine flu चा कहर

 नाशिकमध्ये swine flu चा कहर

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पावसाळाच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्याला स्वाईन फ्लूने ग्रासले आहे. यामुळे काल चांदवड तालुक्यातील तिसगावातील ५० वर्षीय व्यक्तीचा नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. त्यामुळे स्वाईन फ्लू‌मुळे बळी गेलेल्यांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. तसेच नाशिक शहरातही स्वाईन फ्लूचा एक नवीन रुग्ण आढळल्याने या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ वर गेली आहे.

शहरातील ३१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २४ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर बदललेले वातावरण या आजारासाठी पोषक ठरू लागले आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरात स्वाईन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने या आजाराचे गांभीर्य वाढले.

त्यानंतर मे महिन्यात सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९ वर्षीय महिला निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला तसेच नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. पाठोपाठ दिंडोरीतील ४२ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण होऊन तिचे निधन झाले.आता चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला. त्यामुळे स्वाईन फ्लू बळींचा आकडा आता ९ झाला आहे.

दरम्यान शासकीय पातळीवर या आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी काळजी घेतली जात आहे. नागरिकांनीही सर्दी, ताप आदी आजार अंगावर काढू नयेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक पालिकेकडून करण्यात आले आहे.

SL/ML/SL

16 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *