गुलमर्गमधील १०९ वर्ष जुन्या शिवमंदिराला आग
जम्मू काश्मीर,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाचं पर्यटन केंद्र असलेल्या गुलमर्ग येथील टेकडीवर असलेले 109 वर्षे जुने शिवमंदिर आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. त्यात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. राजेश खन्ना-मुमताज यांच्या आपकी कसम चित्रपटातील ‘जय जय शिवशंकर’ हे गाणे येथे चित्रित करण्यात आले होते. याशिवाय ‘रोटी’, ‘अंदाज’ आणि ‘काश्मीर की कली’ या चित्रपटांचे शूटिंगही या मंदिरात झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काल सकाळी ही आग लागली. स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत मंदिर पूर्णपणे जळून खाक झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराला लागलेल्या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
नव्वदच्या दशकात राज्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनानंतर, बारामुल्ला जिल्ह्यातील गुलाम मोहम्मद शेख यांनी 23 वर्षे या मंदिराची देखभाल केली. सर्वजण त्यांना प्रेमाने पंडितजी म्हणत. मंदिराच्या देखभालीसाठी मोहम्मद शेख चॅरिटेबल ट्रस्टकडून मासिक पगार घेत असे.
सुरुवातीला त्यांना मंदिराची चौकीदार म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, पण नंतर त्यांनी पूजा, विधी शिकून घेतले आणि मुख्य पुजाऱ्याच्या अनुपस्थितीत पूजाही केली. गुलाम मोहम्मद 2021 मध्ये निवृत्त झाले. पुरुषोत्तम शर्मा हे नोव्हेंबर २०२३ पासून मंदिराचे मुख्य पुजारी म्हणून कार्यरत आहेत.
मंदिर जाळण्याच्या घटनेवर खेद व्यक्त करताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, ‘गुलमर्गच्या प्रसिद्ध शिव मंदिरात आग लागल्याची बातमी ऐकून खूप दुःख झाले. मला आशा आहे की प्रशासन आगीचे कारण शोधून लवकरात लवकर मंदिराची पुनर्बांधणी करेल, कारण हे मंदिर धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.
SL/ML/SL
6 June 2024