वीज पडण्याचा अलर्ट देणारे दामिनी ॲप
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मान्सून काळात वीज पडून शेतकऱ्यांसह अनेकांचा मृत्यू होतो. या घटना टाळण्यासाठी शासनाने ‘दामिनी: लाईटनिंग अलर्ट’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. हे ॲप भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था, पुणे यांच्यामार्फत विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून खरीप पेरण्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या ४० किमी अंतरात वीज पडू शकते का? याबाबत माहिती मिळणार आहे.
राज्यात आता खरीप पेरण्या जवळ आल्या आहेत. मान्सून देशात सुरु झाला असून अनेक भागात वीज पडून लोकांचे जीव जातात. भारतात वीज पडून दरवर्षी २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. या दुर्घटना लक्षात घेऊन भारत सरकारच्या मदतीने दामिनी ॲप विकसित करण्यात आले आहे. दामिनी हे ॲप वापरकर्त्यांना प्ले स्टोअरमधून डाउनलोड करता येईल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर वापरकर्त्यांना आपली खासगी माहिती भरावी लागेल. यानंतर ॲप सुरु झाल्यानंतर वापरकर्त्यांना एक हिरवी किंवा लाल स्क्रिन दिसेल. वापरकर्ते राहत असलेल्या भागाच्या ४० किमी अंतरावर वीजेचा कोणताही धोका नसल्यास हिरवी स्क्रीन दिसले, तर वीज पडण्याची शक्यता असल्यास लाल स्क्रीन दिसेल. शिवाय या ॲपमध्ये वीजेपासून कसे वाचायचे? यासह इतर महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कृषी विज्ञान केंद्रानेही हे ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
SL/ML/SL
5 June 2024