राहुल गांधी तब्बल ४ लाख मतांनी विजयी
रायबरेली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज जाहीर होत असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी भाजपाला शर्थीने टक्कर दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या पारंपरिक रायबरेली मतदारसंघातून तब्बल ४ लाख मतांनी विजयी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली होती. वायनाड मतदार संघातूनही ते ३ लाख मतांनी विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी पराभव केला आहे. तर वायनाड या मतदारसंघातून राहुल गांधी यांनी आतापर्यंत ६ लाख ४७ हजार ४४५ इतकी मते घेतली आहेत.
राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ‘भारत जोडो यात्रा’ ते ‘भारत न्याय यात्रा’ अशा अनेक माध्यमातून ते अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या याच यात्रांचं फळ आता त्यांना मिळाले आहे.
नुकतीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना कोणता मतदार संघ सोडणार?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, ‘नियमांप्रमाणे एक मतदार संघ सोडवा लागणार आहे, हे माहित आहे. परंतु, मी अद्याप याविषयीचा निर्णय घेतलेला नाही. लोकांशी बोलून आणि वेळ घेऊनच मी हा निर्णय घेणार आहे. सध्यातरी मी याचा विचार केलेला नाही.’
SL/ML/SL
4 May 2024