या देशातील रेल्वेमार्गांच्या देखभालीची जबाबदारी कोकण रेल्वेकडे
![या देशातील रेल्वेमार्गांच्या देखभालीची जबाबदारी कोकण रेल्वेकडे](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/05/Konkan-Railway.jpg)
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या दुर्गम भागात रेल्वे मार्ग उभारणीचे शिवधनुष्य पेललेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या गुणवत्तापूर्ण कामाचा दबदबा आता संपूर्ण जगात पसरला आहे. कोकण रेल्वेने आता थेट केनियन रेल्वेची देखभाल-दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत. कोकण रेल्वेचा आफ्रिका खंडातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केनियामधील मगडी येथे टाटा केमिकल्स कंपनी असून या कंपनीच्या मालाची वाहतूक येथी रेल्वे मार्गावरून होते. या महत्त्वपूर्ण लोहमार्गाच्या देखभालीचा जबाबदारी कोकण रेल्वेने स्वीकारली आहे.
याआधीही कोकण रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम करून व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढवण्यासाठी रेल्वे लिंक तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेने यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामध्ये जयनगर (बिहार – भारत) – कुर्था (नेपाळ) या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. दोन डेमू ट्रेन संच कोकण रेल्वेने नेपाळला दिले आहेत.
कोकण रेल्वे अवघड मार्गांवर रेल्वे मार्ग उभारणी करण्याचे आव्हान नेहमीच तत्परतेने पार पाडते. यातील आजवरचे सर्वांत उल्लेखनीय काम म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये चिनाब नदीवर उभारण्यात आलेला ब्रिज. आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आणि जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज अशी मान्यता असणाऱ्या या ब्रिजचे जोखमीचे काम कोकण रेल्वेने लिलया पार पाडले आहे. हा भारतातील पहिला केबल-स्टे इंडियन रेल्वे ब्रिज आहे.याच्या उभारणीतून भारतीय रेल्वे स्थापत्यक्षेत्रातील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. चिनाब नदीवर कोकण रेल्वेने उभारलेल्या या ब्रिजचं खास वैशिष्ट्य म्हणजे या रेल्वे ब्रिजवर रिश्टर स्केलवरील ८ तीव्रतेच्या भूकंपाचा तसेच अतीतीव्रतेच्या स्फोटाचा काहीही परिणाम होणार नाही. ब्रिजची एकूण लांबी ही १३१५ मीटर आहे.
ML/ML/SL
29 May 2024