लवकरच सुरू होणार मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा
![लवकरच सुरू होणार मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2024/02/Mumbai-Coastal-Road.jpg)
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई कोस्टल रोडचा वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा दुसरा टप्पा १० जूनपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. मार्च महिन्यात उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील मरिन ड्राइव्ह येथील दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीची पाहणी करताना शिंदे यांनी ही घोषणा केली. पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोस्टल रोडच्या दोन ते तीन विस्तारीकरण सांध्यांमध्ये गळती आहे, ती पॉलिमर ग्राऊटिंगद्वारे दुरुस्त केली जाईल. पावसाळ्यातही पाण्याची गळती होऊ नये म्हणून बोगद्याच्या दोन्ही बाजूच्या सर्व २५ सांध्यांना पॉलिमर ग्राऊटिंग लावण्याची शिफारसही मुख्यमंत्र्यांनी केली. दुरुस्तीच्या कामामुळे कोस्टल रोडवरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
कोस्टल रोडचा दुसरा टप्पा १० जून रोजी मरीन ड्राइव्ह ते हाजी अली या मार्गावर सुरू होणार असला तरी वरळीच्या बाजूनेही सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिली. वांद्रे-वरळी सी लिंक ते मरीन ड्राइव्हपर्यंतचा संपूर्ण कोस्टल रोड ऑक्टोबरपर्यंत खुला करण्यात येणार आहे.
मुंबई कोस्टल रोड हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या अंतर्गतचा पहिला टप्पा मार्च महिन्यात सुरु करण्यात आला आहे. मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात विभागलेला आहे. या रोडमुळे मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी कमी होणार असली तरी हा मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प तितकाच खर्चिक आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे. हा प्रकल्प 53 किलोमीटरचा कोस्टल रोड तयार करेल जो वांद्रे-वरळी सी लिंक (BWSL) ला जोडला जाईल आणि दहिसरपर्यंत विस्तारित होईल. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंदाजे 12,721 कोटी रुपये खर्चून हाय-स्पीड कॉरिडॉर बांधत आहे.
ML/ML/SL
29 May 2024