२६ मे पासून समुद्रामध्ये बोटींच्या वापरावर बंदी
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यातच काल IMD ने यावर्षी १९ मे रोजी म्हणजेच दरवर्षींपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हात धुळीच्या वादळासह पावसाने झोडपून काढले. हवामानाच्या या बेभरोशी पार्श्वभूमीवर आता २६ मे पासून समुद्रामध्ये बोटींचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इनलँड व्हेसल अॅक्ट ,१९१७ अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व बोटींचा समुद्रामध्ये वापर करण्यास २६ मे पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंदी घालण्यात आली आहे,अशी माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ.संजय उलगमुगले यांनी दिली.
यावर्षी राज्यातील पावसाळा हंगामाची सुरुवात खराब हवामानाने होणार असल्याने बंदर प्राधिकरणाने हा बोटी बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच हवामान खात्याने राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांचाही समावेश आहे.दरम्यान,मुंबईत धुळीचे वादळ येऊन नासधूस सुरू असतानाच हा पावसाचा यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
SL/ML/SL
15 May 2024