प्रदीप शर्माला लखनभैया एन्काउंटर प्रकरणी जामीन मंजूर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) याला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. लखनभैय्या हत्या प्रकरणी प्रदीप शर्माला नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. लखनभैय्या बनावट एन्काउंटरप्रकरणी त्यांना दोन महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.
सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं शर्मा यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. तसेच शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्याची अट रद्द करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या डबल बेंचनं दिले आहेत. तसेच यासंबंधीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करा, असे आदेशही मुंबई सत्र न्यायालयाला दिले आहेत. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसद्यीय खंडपीठानं हा निर्णय दिला आहे.
लखनभैया उर्फ रामनारायण गुप्ता याला 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा सात बंगला येथील नाना नानी उद्यानाजवळ पोलिसांच्या त्याचा बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. दरम्यान प्रदिप शर्मा यांची सेशन कोर्टानं निर्दोष मुक्तता केली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा निकाल बदलून प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलं होतं.
SL/ML/SL
10 May 2024