केजरीवालांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

FILE- Arvind Kejriwal
नवी दिल्ली, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू घोटाळाप्रकरणी ईडीच्या कारवाईमुळे तिहार जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले होते. ऐन निवडणूकीच्या काळात तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या आम आदमी पक्षाच्या प्रचारकार्याला खिळ बसली होती. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना १ जून पर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे केजरीवाल आता लोकसभा निवडणूक प्रचाराची जोरदार मोहिम उघडू शकणार आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा आदेश दिला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असला तरी सक्तवसुली संचालनालयाने त्याला विरोध केला. अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीचा प्रचार करणे हा घटनात्मक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. १ जूनपर्यंत अंतरिम जामीन म्हणजे २५ मे रोजी दिल्लीत मतदान होईल, तेव्हा केजरीवाल तुरुंगातून बाहेर येतील. त्यानंतर २ जून २०२४ रोजी केजरीवाल यांना पुन्हा तुरुंगात जावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच ४ जून २०२४ रोजी केजरीवाल तुरुंगात असतील.
SL/ML/SL
10 May 2024