अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर डॉ.नरेंद्र दाभोलकर खुनाचा निकाल जाहीर

 अकरा वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर डॉ.नरेंद्र दाभोलकर खुनाचा निकाल जाहीर

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ११ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी दोन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन अंदूरे व शरद कळसकर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या दोन आरोपींची नावे आहेत.तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि अगदी जवळून पिस्तुलाच्या गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह देशातही खळबळ उडाली होती.

डॉ .नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुरुवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास सोपविण्यात आला. डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (रा. सातारा), सचिन अंदुरे (र. छत्रपती संभाजीनगर), शरद कळसकर (रा. जालना), विक्रम भावे आणि ॲड. संजीव पुनाळेकर (दोघे रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमातून अटक करण्यात आली. विक्रम भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ॲड. पुनाळेकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावह गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

आज पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी डॉ .नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान हत्येचा सूत्रधार मोकाट असून तपास यंत्रणांनी त्याचा शोध घ्यावा असं नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ज्या तीन आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.

SW/ML/SL

10 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *