रात्री विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार ‘बॅटमॅन पथक’
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विना तिकिट रेल्वे प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पायबंध घालण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध युक्त्यांचा अवलंब करत असते. पश्चिम रेल्वेकडून आता ‘बॅटमॅन’ (बी अवेअर टीटीई मॅनिंग अॅट नाइट) या पथकाची स्थापना केली असून हे पथक रात्रीच्या वेळेस तिकीट तपासणी करून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करणार आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वेप्रवास करताना ‘आपल्याला तिकीट कोण विचारणार’, असा विचार करत अनेक प्रवासी विनातिकीट प्रथम श्रेणी, एसी लोकलमधून प्रवास करत असल्याचे आढळून आले आहे. आता अशा प्रवाशांवर पश्चिम रेल्वेची नजर असणार आहे.
एसी लोकल आणि प्रथम श्रेणीत द्वितीय श्रेणीचे तिकीट-पासधारकही प्रवास करत असल्याचे आढळते. यामुळे एसी लोकलच्या तिकीट-पासधारकांना बसायला जागा मिळत नाही. म्हणूनच रात्री तिकीट तपासणी वाढवण्याची मागणी सातत्याने प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्याची दखल घेत विनातिकीट प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘बॅटमॅन’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या पथकाने ११ ते १३ मार्च या तीन दिवसांत अचानक तपासणी करून ३,६७९ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १०,०५,०६५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी ‘एक्स’वर दिली. चर्चगेट ते विरार उपनगरी रेल्वे प्रवासात रात्रीच्या वेळी एसी लोकल, प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात.
SL/ML/SL
15 March 2024