जैसलमेरमध्ये वसतिगृहावर कोसळले तेजस फायटर प्लेन

जैसलमेर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमधील जैसलमेर येथे भंयकर घटना घडली आहे. भारतीय लष्कराचं तेजस लढाऊ विमान एका हॉस्टेलवर कोसळल आहे. युद्धसराव सुरू असताना ही दुर्घटना घडली. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार वैमानिक वेळेत विमानातून सुखरूप बाहेर पडला. तब्बल २३ वर्षांनी पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा अपघात झाला आहे. या दुर्घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. जवाहर नगर, जैसलमेर येथे ही घटना घडली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. ते ज्या ठिकाणी भारत शक्ती कार्यक्रमाला संबोधित करत आहेत तेथून अपघाताचं ठिकाण सुमारे 100 किमी अंतरावर आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विमान आगीच्या विळख्यात थेट मेघवाल समाजाच्या हॉस्टेलवर आदळलं. यामुळे येथील विद्यार्थी आणि परिसरातील अन्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमनदलाची वाहने देखील तात्काळ घटनास्थळी पोहचली. सध्या अग्निशमनदलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
SL/ML/SL
12 March 2024