आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा…

 आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा…

दापोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निसर्ग देवतेने पर्यावरण प्रेमींच्या तोंडून निसर्गाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा असा जणू काही संदेशच दिला असल्याचे मत पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांनी दोन आणि तीन मार्चला दापोलीमध्ये पर्यावरण स्नेहींच्या होणाऱ्या सहविचार सभेच्या निमित्ताने व्यक्त केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होमस्टे या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यावरण स्नेही पर्यावरण विषयी सहविचार सभे करता उपस्थित होत आहेत.निवेदिता प्रतिष्ठान दापोली ,टेलर्स ऑर्गनायझेशन पुणे वृक्षसंवर्धिनी पुणे आणि महाएनजीओ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय निवासी सहविचार सभेचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध पर्यावरण स्नेही आपापल्या परीने निसर्ग संरक्षण करित असतात. मात्र एकीचे बळ फार महत्त्वाचे असून या अनुषंगानेच २०१७ आणि १८ मध्ये दापोली येथे दोन दिवसाची कार्यकर्त्यांची कार्यशाळा त्याचप्रमाणे २०१८ , २०१९ या वर्षी ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली होती. याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध भागातून दोन / तीन मार्च रोजी पर्यावरण स्नेही कार्यकर्त्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी दिली .

या सहविचार सभेमध्ये प्लास्टीक कचरा मुक्त शाळा विषयी प्रस्ताव मांडणी. पाणी नियोजन सांघिक लढा. मानसिक बदल घडवून आणणयासाठी संघटित कृती आराखडा. वणवा मुक्त गाव संकल्पना. कचरामुक्त पर्यटन संकुल संकल्पना. कचरा मुक्त मी संकल्पना आदी विषयांवर चर्चात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे निसर्गाला आरक्षण मागण्यासाठी कृती आराखडय़ासह निवेदन सादर करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.

विकासाच्या नावाखाली सर्वत्र बेसुमार जंगलतोड ,सिमेंट च्या जंगलांची गगनचुंबी उभारणी ,
काँक्रिटीकरण यासमवेत विकासामागून येणारी भकास गंगेला रोखणं ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
पाण्याचे वाढते प्रदुषण आणि झपाट्याने घटत जाणारी भूजल पातळी यामुळे मूळातच शुद्ध पाण्याचा असणारा संचय आणखी कमी होत आहे. प्लास्टीक च्या अतिरिक्त स्वैर वापरामुळे मानवी रक्तात प्लास्टीकचा अंश सापडल्याचा अहवाल सादर झाला आहे.
यामुळे क्षयरोगासारख्या आजारांना आपणच स्वतःहून आमंत्रित करतो आहोत. याची जाणीव प्रत्येकाने करून घेणे अत्यावश्यक आहे.सद्यस्थितीत शहरांपासून ग्रामीण क्षेत्रातही प्लास्टीक कच-याने आपला फास आवळायला सुरूवात केली आहे.

हे रोखणं आणि निसर्ग अबाधित राखणं हे फक्त पर्यावरण स्नेहींचेच काम नसून प्रत्येक नागरिकाने यासाठी माझ काम असं म्हणून कच-याचं वर्गीकरण करणं ,रस्त्यावर आणि गटार ,ओहळ ,नदीमध्ये कचरा न फेकणं ,जलप्रदूषण न करणं ,वृक्षसंवर्धन करणं आणि पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी शंभरटक्के कृती करंण ही पंचसूत्री अवलंबणे काळाची गरज आहे.

कोकणाला मानव निर्मित वणव्यांचा जणू शापच लागला आहे.फेब्रुवारी महिन्यापासून कोकणातील डोंगरावर आगीचे तांडव सुरू असल्याचे क्लेशकारी दृष्य नजरेस पडते.यामुळे निसर्गचक्र बिघडून वनसंपदेसह वन्यजीवांचे अपरिमीत नुकसान होते ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होऊन पूर्ण निसर्ग साखळी विस्कळीत होते. हे वणवे रोखणं प्रत्येकाचं काम आहे.गाव तेथे वणवामुक्त मंडळाची आणि वणवारोधक साहित्याची बांधणी करणे अत्यावश्यक आहे.

निसर्ग संरक्षणाबाबत छोट्याछोट्या गोष्टी प्रत्येकानं समजून घेऊन निसर्गाला आरक्षित करण्यासाठी सहभागी होणं काळाची गरज आहे; अन्यथा २०३० ते २०५० दरम्यान आपण विनाशाच्या शेवटच्या पायरीवर असू.आज हा विनाशाचा किनारा दिसू लागलाय आपली नाव अंताच्या किना-याकडे निघाली आहे .तीचे सुकाणू फिरवून हरितमय आयुष्याकडे तिला वळवण्यासाठी सर्वांनी कृती करण्याची अत्यावश्यक्यता निर्माण झाली आहे. आपल्या भूमातेला ,निसर्ग देवतेला नतमस्तक होऊन निसर्गाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार रहा अशी साद या निमित्ताने घालत आहोत.

ML/KA/PGB 26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *