पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांची शिक्षा

रावळपिंडी, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायफर प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) नेते शाह महमूद कुरेशी यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज रावळपिंडी येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली.इम्रान आणि कुरेशी यांच्या उपस्थितीत न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निर्णय दिला.
सुनावणीदरम्यान न्यायाधीश झुलकरनैन यांनी पीटीआय नेत्यांना सांगितले की, त्यांचे वकील न्यायालयात हजर झाले नाहीत आणि त्यांना सरकारी वकील देण्यात आले आहेत. कुरेशी आणि इम्रान यांना कलम 342 अंतर्गत प्रश्न विचारण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, आपले वकील हजर नसल्याने आपले म्हणणे नोंदवता आले नाही, असे कुरेशी यांनी सांगितले.
एप्रिल 2022 मध्ये सरकार पडल्यानंतर, इम्रान खान यांनी सतत दावा केला की अमेरिका आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांचे सरकार पाडण्याचा कट रचला होता. खान यांचा आरोप आहे की, त्यांना या कटाची माहिती अमेरिकेतील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत असद मजीद खान यांनी एका गुप्त पत्राद्वारे दिली होती. राजनैतिक भाषेत या पत्राला सायफर म्हणतात.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हणजेच परराष्ट्र मंत्रालयाने हे संकेत पत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला पाठवले होते. गेल्या वर्षी अनेक निवडणूक रॅलींमध्ये इम्रान हे पत्र हातात घेतलेले दिसले होते. अमेरिकेच्या सांगण्यावरून आपले सरकार लष्कराने पाडले, असा दावा त्यांनी केला होता. कायदेशीरदृष्ट्या, हे पत्र नॅशनल सीक्रेट होते, जे सार्वजनिक ठिकाणी दाखवले जाऊ शकत नव्हते.
इम्रान खान यांना 5 ऑगस्ट 2023 रोजी तोशाखाना प्रकरणात 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा निकाल देताना इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने खान यांच्यावर 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. यानंतर लाहोर पोलिसांनी त्यांना अटक केली.
ML/KA/Sl
30 Jan. 2024