मिनिमम बॅलन्स चार्जबाबत RBI चा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने बँक खाते धारकांचे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा निर्णय बँक खात्यातील किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) रकमेबाबत घेण्यात आला आहे. जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून कोणत्याही प्रकारचे व्यवहार करत नसाल तर तुम्हाला किमान शिल्लक शुल्क भरावे लागणार नाही. हा नियम १ एप्रिल २०२४ पासून देशभर लागू होणार आहे. RBI च्या या निर्णयामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असू आता निष्क्रिय (Inactive) खात्यांमध्ये किमान शिल्लक नसली तरीही शुल्क कापले जाणार नाही.
रिझर्व्ह बँकेने बँकांना सांगितले आहे की, ज्या बँक खात्यांमध्ये दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही, अशा बँक खात्यांवर किमान शिल्लक ठेवण्याचा नियम लागू करता येणार नाही. रिझर्व्ह बँकेच्या आता नव्या नियमानुसार आता बँका शिष्यवृत्ती किंवा थेट लाभ (डायरेक्ट बेनिफिट) हस्तांतरणासाठी उघडलेली खाती ही खाती दोन वर्षांहून अधिक काळ वापरली गेली नसली तरीही निष्क्रिय म्हणून वर्गीकृत करू शकत नाहीत. आरबीआयने नुकतेच निष्क्रिय खात्यांबाबत एक परिपत्रक काढून बँकांना सूचना दिल्या आहेत.
आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, या सूचनांमध्ये बँकिंग व्यवस्थेतील दावा न केलेल्या ठेवी कमी करण्याचा आणि त्यांच्या योग्य दावेदारांना अशा रकमा परत करण्याचा प्रयत्न केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरबीआयच्या नवीन नियमांनुसार बँकांना खाते निष्क्रिय करण्याबाबत ग्राहकांना माहिती द्यावी लागेल. बँकांमध्ये बेवारस पडून असलेला पैसा कमी करण्यासाठी आरबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता नवीन परिपत्रकही याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
नवीन नियमांनुसार बँकांना एसएमएस, पत्र किंवा ईमेलद्वारे ग्राहकांना त्यांची खाती निष्क्रिय करण्याबद्दल माहिती द्यावी लागेल. तसेच निष्क्रीय खात्याच्या मालकाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास गॅरेंटरशी संपर्क साधण्याचेही आरबीआयने बँकांना सांगितले आहे. तर नवीन खाते उघडताना हमीदार आवश्यक असेल निष्क्रिय (Inactive) खाते पुन्हा सुरू करण्यासाठीही ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आरबीआयनुसार, मार्च २०२३ च्या अखेरीस दावा न केलेल्या ठेवी २८ टक्क्यांनी वाढून ४२,२७२ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत, ही रक्कम वर्षभरापूर्वी ३२,९३४ कोटी रुपये एवढी होती.
SL/KA/SL
4 Jan. 2024