कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मली चित्त्याची आणखी ३ नवीन पिल्ले
भोपाळ, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी आली आहे. मादी चित्ता आशाने ३ पिलांना जन्म दिला आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांनी X वर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली आहे. भूपेंद्र यादव यांनी कुनो नॅशनल पार्कमध्ये जन्मलेल्या तीन पिल्लांचा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये तीनही पिल्ले सुदृढ आणि फिरताना दिसत आहेत. प्रोजेक्ट चीता अंतर्गत आफ्रीकेतून चित्ते भारतात आणण्यात आले होते. मात्र मध्यंतरी काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या प्रोजेक्टवर टीकेची झोड उठली होती. दरम्यान आशाने ३ पिलांना जन्म दिल्यामुळे प्रोजेक्टबाबत पुन्हा आशादायक चित्र निर्माण होण्यास मदत होणार आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या १४ प्रौढ आणि चार पिल्लं आहे. यामध्ये गौरव, शौर्य, वायु, अग्नी, पवन, प्रभास आणि पावक यांचा समावेश आहे. यापैकी दोनच चित्ते खुल्या जंगलात असून पर्यटकांना पाहता येतात. उर्वरित सर्व चित्ते सध्या मोठ्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. मार्च२०२३ मध्ये ज्वाला या मादी चित्ताने चार पिलांना जन्म दिला होता. मात्र त्यापैकी तीन पिलांचा मृत्यू झाला. ज्वालाला नामिबियातून आणण्यात आले होते.
दरम्यान, भारतातील चित्ता प्रकल्पाला चालना देण्यासाठी नामिबियातून चित्ते येथे आणण्यात आले होते.भारतात चित्ता पूर्णपणे नामशेष झाला होता.त्यानंतर नामिबियातून प्रथम ८ चित्ते आणण्यात आले आणि त्यानंतर १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते आणले.कुनो उद्यानात आतापर्यंत ६ चित्ते मरण पावले आहेत.मात्र, आता तीन पिल्ले जन्माला आल्यानंतर जंगलात चित्तांची संख्या वाढली आहे.
SL/KA/SL
3 Jan. 2024