मालमत्ता खरेदीनंतर स्वयंचलित पध्दतीने होणार करदात्यांची नोंद

 मालमत्ता खरेदीनंतर स्वयंचलित पध्दतीने होणार करदात्यांची नोंद

पनवेल, दि. २१ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालमत्ता खरेदी विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना पनवेल महानगरपालिका कर देयकावरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक (UPIC ID NUMBER) आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असल्याचे महापालिकेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. या क्रमांकाद्वारे खरेदीदाराची स्वयंचलित पध्दतीने करदाता म्हणून आपोआप नोंदणी होणार आहे.

ही सुविधा राबविणारी महाराष्ट्रात मुंबईनंतर पनवेल महानगरपालिका ही दुसरी महानगरपालिका असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवरती आयुक्त देशमुख नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल ३ ए. पी चौधरी, सहाय्यक दुय्यम निबंधक पनवेल 1 एम.पी.लोद, मालमत्ता विभाग उपायुक्त गणेश शेटे, अभियंता नागनाथ डिगोळे यांची आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पनवेल येथील मुख्यालयात बैठक झाली.

यावेळी स्वयंचलित पध्दतीने नोंदणी करताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावरती चर्चा करण्यात आली.
व्यवसायपूरकता (इज ऑफ डुंइंग बिझनेस) या उपक्रमांतर्गत नागरी स्वराज्य संस्थामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध नागरी सेवा एकत्मिक स्वरूपात देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने महत्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.

महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधा अधिक पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ही नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे. एखाद्या मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर त्या मालमत्तेची करदाता अभिलेख (टॅक्स पे रेकॉर्ड) यांवरती नोंद केली जाते. महापालिका देणार असलेल्या या नवीन सुविधेअंतर्गत महापालिका हद्दीतील मालमत्ता खरेदी- विक्री करतेवेळी सहाय्यक निबंधक पनवेल यांच्याकडे नोंद करताना महानगरपालिकेच्या कर देयका वरील मालमत्ता सांकेतिक क्रमांक आपल्या दस्तामध्ये नोंद करणे आवश्यक असणार आहे.

तसेच मालमत्ताधारकांनी मालमत्ता खरेदी करताना मालमत्तेचा मालमत्ता कर थकबाकीसह पूर्ण भरणा केलेबाबत खातरजमा करुन पावती आपल्या दस्तास जोडणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी आपल्या नोंदणी दस्तामध्ये मालमत्ता सांकेतिक क्रमांक नमूद केल्यास आपले नाव महापालिकेच्या मालमत्ता कर प्रणालीत तात्काळ दाखल होणार आहे.यामुळे खरेदीदाराला पालिकेकडे करदाता म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार नाही, तसेच मालमत्ता धारकांना आपले स्वत:चे कर देयक पालिकेच्या वेबसाईटवरती सहजरित्या उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

ML/KA/SL

21 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *