लग्नाच्या मुहूर्तांमूळे या राज्यात बदलली विधानसभा निवडणूकीची तारीख

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग देशातील निवडणूकांमध्ये अधिकाधीक मतदार मतदान करतील याची सर्वतोपरी काळजी घेते. केंद्रीय आयोगानं दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. यामध्ये राजस्थानात २३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार होतं. पण आता या तारखेत बदल करण्यात आला असून २५ नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. पण निकाल मात्र आहे त्याच दिवशी ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
यापूर्वी निश्चित केलेल्या तारखेला अर्थात २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानात लग्नाचे मुहूर्त असल्यानं या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोक लग्न समारंभात व्यस्त असणार आहेत. तसेच यामुळं वाहतुकीची देखील समस्या निर्माण होऊ शकते. यामुळं मतदानावर परिणाम होऊन मतदानाचं प्रमाण घटू शकतं.
या बदलाबाबत निवडणूक आयोगानं अधिकृत निवदेन जाहीर केलं आहे. यामध्ये म्हटलं की, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि माध्यमांनी उपस्थित केलेल्या एका विषयाला अनुसरुन हा बदल करण्यात आला आहे.
तारखेत बदल करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. कारण देवउठनी एकादशी 23 तारखेला आहे आणि त्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात विवाह होऊ शकतात. हे लक्षात घेऊन तारखा बदलण्यात आल्या आहेत.
SL/KA/SL
11 Oct. 2023