१०७ किलोच्या शुद्ध चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील प्रसिद्ध असलेल्या अनोखा गणेश मंडळाने यंदा तब्बल १०७ किलोच्या चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलीय. शहराचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून आरती करून स्थापना करण्यात आलीय. आज सर्वत्र गणरायाचे मोठ्या थाटात आगमन झाले असून जालन्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला जाईल अशा तब्बल ५ फूटाच्या शुद्ध चंदीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस मध्ये ही मूर्ती साकारण्यात आली आहे. या मूर्तीला बनवायला तब्बल ६ महिन्यांची मेहनत लागली असून ५ कारागिरांच्या मदतीने ही आकर्षक, देखणी आणि विलोभनीय मूर्ती घडविण्यात आली आहे. या मूर्तीची किंमत जवळपास ८५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या गणेश उत्सवात काही तरी वेगळे करूया अशी कल्पना अनोखा गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भारतीया यांना सूचली आणि त्यावर अमल करावे म्हणून त्यांनी ही कल्पना आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली .
त्यानंतर अनोखा गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी यावर एक मत करून ही मूर्ती साकारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही मूर्ती बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस येथून ही शुद्ध चांदीची मूर्ती बनवून घेतली आहे. ही मूर्ती चांदीची असल्या कारणाने तिचे विसर्जन करणार नसून १० दिवसांनंतर मंदिरामध्ये तिला स्थापित करण्यात येणार आहे.
ML/KA/SL
20 Sept. 2023