औरंगाबाद आणि उस्मानाबादचे झाले अधिकृत नामकरण

छ. संभाजीनगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद महसुली विभाग आणि उस्मानाबाद जिल्हा यांच्या नव्या अधिकृत नामकरण फलकाचे अनावरण आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय…छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज येथे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते.
ML/KA/SL
16 Sept. 2023