गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफ

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्रक आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
सरकारनं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार १६ सप्टेंबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ असे सलग १६ दिवस कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ असेल. या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य मार्गावरील पथकरातून गणेशभक्तांच्या वाहनांना व एसटी महामंडळाच्या वाहनांना सूट मिळणार आहे.
इथे मिळतील टोल फ्री पास?
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक पोलीस चौकी किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) टोल फ्री पास मिळतील. या पासेसवर ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’, वाहन क्रमांक व चालकाचे नाव नमूद असेल.
एसटी महामंडळाच्या वाहनांना त्या-त्या जिल्ह्यातील पोलीस खाते किंवा आरटीओकडून पास उपलब्ध करून देण्यात येतील.
टोल माफीचे हे पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरले जाणार आहेत.
टोलमाफी बरोबरच प्रवासादरम्यान भाविकांना अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
SL/KA/SL
15 Sept. 2023