एस टी बस आगारातच भरविली विद्यार्थ्यांनी शाळा

वाशिम, दि. १४(एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाट्यावर एसटी महामंडळाची बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयातच आपली शाळा भरविली आणि एस टी प्रशासनाचा निषेध केला.
वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाटा येथील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात जातात. मात्र मागील महिनाभरापासून एस टी महामंडळाची बस थांब्यावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेकवेळा विद्यार्थ्यांनी पैदल चालून शाळा गाठली. गावकऱ्यांनी बस थांबण्यासंदर्भात अनेकवेळा निवेदनाद्वारे विनंती करून देखील एस टी महामंडळाकडून कुठलीही दखल न घेतल्याने संतप्त पालकांनी बस आगार व्यवस्थापकाचे कार्यालय गाठून तेथेच शाळा भरवीत संबंधित प्रकाराचा जाब विचारला.
दरम्यान आगार प्रमुख माडावी यांनी विद्यार्थी पालकांच्या मागणीची दखल घेत चालक-वाहक यांच्यावर उचित कारवाई करून बस थांबविण्यासंदर्भात आश्वासित केले आणि मगच विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
ML/KA/SL
14 Sept. 2023