कॉ . कै. मदन फडणीस यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मृती व्याख्यान

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):एन. एम. लोखंडे महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ स्टडीज मध्ये नुकतेच ‘कॉम. मदन फडणीस मेमोरियल लेक्चर’ आयोजित करण्यात आले होते. दिवंगत विख्यात कामगार वकील आणि कामगार नेते कॉ. मदन फडणीस ह्यांच्या शताब्दी वर्षात त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदरांजली वाहण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कॉ. मदन फणीस ह्यांनी आपले पूर्ण आयुष्य हे कामगारांच्या न्यायाकरता घालवले. टेक्सटाईल, बँकिंग, इंजिनियरिंग, इन्शुरन्स, फार्मासुटिकल, अशा अनेक क्षेत्रांमधील कामगार वर्गाला त्यांनी सातत्याने न्याय मिळवून दिला. ह्या मेमोरियल लेक्चरचा विषय होता ‘लेबर लॉ अँड पॉलीसीज- अ कंटिन्युअस इव्होल्यूशन प्रोसेस’. मुंबई हाय कोर्टचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि जेष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. ह्या वेळीस इंस्टीट्युटचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, ह्युमन रिसोर्स एक्सपर्टस इत्यादी लोक उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थी वर्गाला माजी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी ‘कोणतीही गोष्ट फक्त ऐकून त्यावर मत तयार न करता त्या बाबतीत वाचून त्याची पूर्णपणे माहिती गोळा करून घेऊन मगच त्यावर आपले मत निश्चित करणे गरजेचे आहे’ असा सल्ला दिला. कायद्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघावे आणि कायद्याच्या तरतुदींचा अर्थ लावण्यापूर्वी त्याचा संदर्भ समजून घेऊन त्याचा अर्थ लावावा हेही त्यांनी समजावले. नवीन कामगार कायदे हे निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील असे त्यांनी नमूद केले.
डॉ. भालचंद्र कांगो ह्यांनी विद्यार्थ्यांना सुचवले की कामगार वर्गाकडे माणुसकीच्या नात्याने बघणे गरजेचे आहे. कायद्याच्या तरतूदी मांडत असताना त्याकडे केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून न बघता त्याकडे कामगाराच्या श्रमाच्या दृष्टिकोनातून बघणेही आवश्यक आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात परंपरेप्रमाणे अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर कॉ. मदन फडणीस ह्यांच्या तीन कन्या सौ. मृदुला राजे, सौ प्रतिमा बावकर आणि सौ सोनल साटेलकर ह्यांनी आपल्या पित्याच्या प्रतिमेला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहिली. अतिथींचा आदर-सत्कार कॉम. फडणीस ह्यांची नातवंडे पूर्वा बावकर, डॉ. अद्वैत साटेलकर व चैत्रावी साटेलकर ह्यांनी केला.
व्याख्यानाच्या सुरवातीला एम.आय.एल.एस. चे डायरेक्टर शशांक साठे ह्यांनी अतिथींचे स्वागत केले आणि सर्वाना एम.आय.एल.एस बद्दलची माहिती दिली. त्या नंतर कॉम. फडणीस ह्यांची मोठी नात प्राची राजे हिने कॉ. फडणीस ह्यांच्या ८६ वर्षांचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाच्या अंती कॉम. मदन फडणीस ह्यांचे जावई तसेच लॉ प्रॅक्टिस मधले त्यांचे जुनिअर ऍड. लक्ष्मीकांत साटेलकर ह्यांनी सर्वांचे आभार मानले.
ML/KA/PGB 12 Sep 2023