नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जा
नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक ला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. वर्ल्ड ॲथलेटिक्स संघटनेचे सीईओ जाॅन रिडगाॅन यांनी सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय वर्ग २ ॲथलेटिक्स सुविधायुक्त ट्रॅकचा दर्जा प्राप्त प्रमाणपत्र दिले आहे. रवी नगर चौक स्थित क्रीडा परिसरात अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर विद्यापीठाला सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात यश आले आहे.
शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील क्रीडा संकुल परिसरात अद्ययावत सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या या सिंथेटिक ट्रॅकवर ४०० मीटरच्या एकूण आठ लेन आहेत. ट्रॅक्टवर पूर्व दिशेला गोळा फेक आणि भालाफेक तर पश्चिम दिशेला स्पर्धेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दक्षिण दिशेला दोन ठिकाणी लांब उडी व तिहेरी उडीसाठी जम्पिंग पीटची व्यवस्था आहे.
ट्रॅकवर ट्रिपल चेस प्रकारासाठी विशेष सुविधा आहे. ट्रॅक खराब होण्यापासून रोखण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम व्यवस्था ही आहे. ट्रॅकवर खेळाडू व तांत्रिक अधिकाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ट्रॅकच्या आत कोणीही प्रवेश करू नये, यासाठी सभोवताल तारेची कुंपण टाकण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वी सरावासाठी मैदानाच्या पूर्व व पश्चिम दिशेला विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मैदानावर दिवस- रात्रीचे सामने खेळता येणार आहे. राज्य क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला प्रमाणित सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या सिंथेटिक ट्रॅक वर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करता येणार आहे.
ॲथलेटिक संघटनेकडून कुलगुरूंचा सत्कार
विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकला आंतरराष्ट्रीय वर्ग २ ॲथलेटिक्स सुविधायुक्त ट्रॅकचा दर्जा प्राप्त झाल्याने नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.
ML/KA/SL
21 Aug 2023