येरवडा कारागृहात रंगणार भजन आणि अभंग स्पर्धेची अंतिम फेरी
पुण, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवार, 13 जून रोजी येरवडा कारागृह परिसरात होणार आहे, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवाचे निमित्त साधून महाराष्ट्र कारागृह विभागाच्या सहकार्याने शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत येरवडा, कोल्हापूर (मध्यवर्ती आणि जिल्हा), सातारा, अहमदनगर, मुंबई, ठाणे, तळोजा, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी, औरंगाबाद, नाशिक, धुळे, परभणी, बीड, नांदेड, नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, आणि वाशिम असे राज्यातील 29 कारागृहांमधील बंदीजन सहभागी झाले होते. कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृह या संघांची प्राथमिक फेरीतून महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि अहमदनगर जिल्हा कारागृह या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तर स्पर्धेत सहभागी बंदीजनांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.महाअंतिम स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय संघास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या कारागृहांना दिना व प्रकाश धारीवाल यांच्या वतीने दिवंगत कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ 100 पुस्तकांचा संच, हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीची प्रतिमा भेट देण्यात आली आहे.*आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा**सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा**हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन एकविध**तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे*जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या याच अभंगाप्रमाणे अध्यात्मातून प्रबोधन आणि प्रबोधनातून मतपरिवर्तन या एकमेव उद्देशाने राज्यातील कारागृहांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.महाअंतिम फेरीला सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन सायंकाळी 5 वाजता गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
ML/KA/PGB 8 Jun 2023