देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी प्लान्ट या राज्यात

 देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी प्लान्ट या राज्यात

अहमदाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला उभारी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या लिथिअम धातूचा मोठा साठा या वर्षांच्या सुरुवातीलाच जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक राज्यात सापडला होता. त्यानंतर आता देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प (Lithium-ion Cell Plant) गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी टाटा ग्रुपने गुजरात सरकारशी १३ हजार कोटींचा करार केला आहे. राज्य सरकारने काल याबाबत माहिती दिली. २०३० सालापर्यंत राज्यात ५० टक्के कार्बन इमिशन-फ्री एनर्जी आणि १०० टक्के इलेक्ट्रॉनिक व्हेईकल अ‍ॅडॉप्शनचं लक्ष्य गुजरात सरकारने ठेवलं आहे. हा प्रकल्प त्यासाठी पूरक असणार आहे.

अग्रतास एनर्जी स्टोरेज सोल्यूशनने शुक्रवारी राज्य सरकारसोबत नवीन इलेक्ट्रॉनिक पॉलिसी अंतर्गत एक सामंजस्य करार केला. ही मोठी फॅक्टरी उभारण्यासाठी हा करार पाया ठरणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अग्रतास एनर्जी ही टाटा ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे.

20 गिगावॅट एवढी एनर्जी तयार करण्याची या प्लांटची क्षमता असेल. यासाठी सुमारे १३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये बॅटरी उत्पादनाची परिसंस्था तयार करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती सरकारने दिली. या प्लांटमुळे (Tata Lithium-ion Battery plant) सुमारे १३ हजार व्यक्तींना नोकरी उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं जातंय.

गुजरात सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे सचिव विजय नेहरा, आणि अग्रतास एनर्जीचे सीईओ राकेश रंजन या दोघांनी या करारावर स्वाक्षरी केली. “या फॅक्टरीसाठी सरकारचा संपूर्ण पाठिंबा राहील. ही फॅक्टरी पूर्णपणे लिथियम-आयन सेल बनवण्यासाठी समर्पित असेल. ईव्ही बॅटऱ्यांच्या उत्पादनासाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री पटेल यांनी दिली.

सध्या भारतात चीन आणि कोरियामधून बॅटरी सेल आयात करण्यात येतात.सध्या भारत लिथियमसाठी चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना या देशांवर अवलंबून राहावे लागते. मात्र आता भारतात लिथिअमचे साठे
सापडल्यामुळे आणि गुजरातमध्ये लिथिअम बॅटरी प्रकल्प होऊ घातल्यामुळे देशाला आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्यास काही अंशी पाठबळ मिळेल.

SL/KA/SL
3 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *