सहन करणार नाही म्हणजे काय ते स्पष्ट करा…
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार ते सांगा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी उध्दव ठाकरे यांना दिले आहे. यासोबतच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे.
काल मालेगाव इथे जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना इशारा देत सावरकर हे आमचे दैवत असून त्यांच्यावरील टीका सहन करणार नाही असे सांगितले होते , जाहीररित्या आपण हे सांगत असल्याचे ही ठाकरे म्हणाले होते.
त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. सावरकर होणे सोपे आहे का , त्यासाठी किती त्याग करावा लागतो याची कल्पना राहुल गांधी यांना आहे का असेही त्यांनी विचारले.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या तत्कालीन मंत्री मणीशंकर अय्यर यांना जोडे मारण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, तीच हिंमत आज उध्दव ठाकरे राहुल गांधी यांच्या बाबत दाखवतील का असा सवाल ही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
सावरकरांच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी लवकरच राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
ML/KA/PGB
27 Mar. 2023