अखेर येत्या नऊ महिन्यात मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार !
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण भूसंपादन आणि विविध विभागांच्या रखडलेल्या परवानग्या यामुळे आजवर रखडले होते मात्र आता यावर मार्ग काढून संपूर्ण महामार्ग काँक्रीटीकरण करून पुढील नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी सभागृहात दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना आदिती तटकरे यांनी उपस्थित केली होती, अमित साटम , सुनील प्रभू यांनी उपप्रश्न विचारले.
पळस्पे ते इंदापूर मधील काम ही काँक्रीटीकरण करूनच केलं जाईल, त्यातील भूसंपादन पूर्ण करण्यात येत आहे, हा टप्पा मूळ कंत्राट दाराला बाजूला सारून नवीन कंत्राटदार नेमून दोन स्वतंत्र टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असं चव्हाण म्हणाले .मे महिन्यापर्यंत एका बाजूची मार्गिका पूर्ण करण्यात येईल उर्वरित भाग पुढील नऊ महिन्यात पूर्ण होईल असं मंत्री म्हणाले.
परशुराम घाटातील काम आव्हानात्मक होतं, त्यासाठी आवश्यक बाधित घरांचं स्थलांतर केलं जाईल, चिरणे इथून पर्यायी रस्ता तयार करण्यात येत आहे. राजापूर ते गोवा रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे अशी माहिती ही रवींद्र चव्हाण यांनी दिली.
कर्करोग शोधासाठी विशेष मोहीम
राज्यातील चाळीस वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत आठवड्यातून एकदा महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम राबवली जाईल आणि नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी विशेष मोहीम राबवून विशेष लसीकरण करण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना कॅप्टन तमिळ सेलवन यांनी उपस्थित केली होती, वर्षा गायकवाड, आशीष शेलार , जितेंद्र आव्हाड आदींनी उप प्रश्न उपस्थित केले होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि वांद्रे इथे नवीन कर्करोग रुग्णालये उभारण्यात येतील असं ही मंत्री म्हणाले. याबाबत आपल्या दालनात बैठक घेऊन त्यावर विस्तृत चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिली.Finally, the work of Mumbai Goa highway will be completed in the next nine months!
गड किल्ले ही स्फूर्तिस्थाने
राज्यातील गड किल्ले ही राज्याची स्फूर्तिस्थान आहेत त्यामुळे त्याचे विद्रुपीकरण करणे , तिथे नशापाणी करणे यासाठी आता दहा हजार रुपये इतका दंड आणि तीन महिने कारावासाची शिक्षा होईल असा कायदा करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली , याबाबतची लक्षवेधी संग्राम थोपटे यांनी उपस्थित केली होती.
ML/KA/PGB
13 Mar. 2023