सुहास लिमये यांचे ‘मेघदूता’वरील पुस्तक प्रकाशित.

 सुहास लिमये यांचे ‘मेघदूता’वरील पुस्तक प्रकाशित.

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्व.सुहास लिमये यांच्या व्याख्यानांवर आधारित ‘मेघदूत (पूर्वमेघ)- एक विवेचक अभ्यास’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच पार पडला. हे पुस्तक म्हणजे लिमये सरांनी दीड वर्षे अत्यंत मेहनत घेऊन दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे संपादक मंडळाने केलेले संपादन आहे.

या प्रकाशन समारंभासाठी ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ येथे संशोधन शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.डॉ.निर्मला कुलकर्णी या प्रमुख वक्त्या म्हणून लाभल्या होत्या. पुस्तकाचे प्रकाशन ‘जिज्ञासा अभ्यास मंडळा’च्या वतीने पाणिनीय व्याकरण प्रवेशासाठी सुलभ ठरणारे ‘अष्टाध्यायीप्रवेश’ हे पुस्तक शिकवत असलेल्या डॉ.लीना दोशी यांच्या हस्ते पार पडले.

प्रा.डॉ.निर्मला कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात कालिदासाची काव्यवैशिष्ट्ये आणि मेघदूत या अजरामर काव्याच्या प्रेरणास्रोतांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा घेत, कालिदासाने मेघदूत लिहिले आणि संदेशकाव्य नावाचा एक काव्यप्रकारच संस्कृत साहित्यात निर्माण झाल्याचे सांगितले. या पुस्तकाच्या रूपाने लिमये सर घराघरात पोहोचतील आणि अनेकांना प्राचीन संस्कृत वाङ्मय वाचण्याची आणि संस्कृत शिकण्याची प्रेरणा देतील, असा आशावादही डॉ.निर्मला कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकाने काय, कशी आणि किती तयारी करावी याचा वस्तुपाठच लिमये सरांनी घालून दिल्याचे सांगत डॉ.लीना दोशी यांनी पुस्तकांचा ढिगारा, कोरे कागद, अनेक कोश यांच्या गराड्यात बसून आठ-आठ, दहा-दहा तास एकेका श्लोकाची तयारी करणाऱ्या लिमये सरांचे एक चित्रच श्रोत्यांपुढे उभे केले. कालिदासाने उज्जयिनी नगरीचा उल्लेख ‘कान्तिमत् खण्डम्’ म्हणजेच स्वर्गाचा एक प्रकाशमान तुकडा असा केला आहे. मेघदूतावरील भाषांतरे, टीका, समश्लोकी अशा अनेक पुस्तकांमध्ये लिमये सरांचे हे पुस्तक म्हणजे ‘कान्तिमत् खण्ड’च ठरणार असल्याचे कौतुकोद्गारही डॉ.लीना दोशी यांनी यावेळी काढले. ग्रंथालीचे विश्वस्त श्री.सुदेश हिंगलासपूरकर यांनी लिमये सरांच्या आठवणींबरोबरच ग्रंथालीच्या कार्याची माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मोहन हर्षे यांनी केले.

कार्यक्रमाला सरांचे विद्यार्थी, मित्रपरिवार आणि संस्कृत प्रेमी अभ्यासक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Suhas Limaye’s book on ‘Meghduta’ published.

ML/KA/PGB
11 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *