सत्तेतून अचानक पायउतार व्हावं लागल्यानं विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तेतून अचानक पायउतार व्हावे लागले त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आलेली आहे त्यामुळे त्यांना सरकारची चांगली कामं दिसतच नाहीत असं सांगत राज्यपालांच्या अभिभाषणात अनेक चांगले विषय असताना विरोधक मात्र त्याची राजकीय चर्चाच करत बसले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली , विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते उत्तर देत होते.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करीत नाही , राज्यात विकासाची अनेक कामं सुरू आहेत , या गेमचेंजर प्रकल्पांमधून आम्ही राज्याचं एक वेगळं चित्र उभं करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात दिली.
शेतकऱ्यांना देणं असलेले पैसे दिले असून त्यासाठी बारा हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, नियमित पीक कर्ज फेडणारे शेतकरी , सततच्या पावसामुळे नुकसान झालेले , अतिवृष्टीचा फटका बसलेले, गोगलगायी मुळे अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे.
सिंचनाच्या २३ प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे पाच लाख एकवीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, पाचशे ठिकाणी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाने उभे राहत आहेत , नागपूर ,पुणे, मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोचे जाळे विणले जात आहे, समृद्धीचा दुसरा टप्पा , नांदेड या मार्गाला जोडणे , नागपूर गोवा दरम्यानचा मार्ग , मुंबई गोवा कोस्टल रोड, शिवडी न्हावा शेवा समुद्री मार्ग ,पुणे रिंग रोड, लोणावळा लेक खालील भुयारी मार्ग असे असंख्य प्रकल्प राज्यात सुरु आहेत.
दावोस परिषदेला खर्च झाला पण एक लाख सदतीस हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आली , त्यातील सहा प्रकल्पांना जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे, यापेक्षाही अधिक गुंतवणूक राज्यात येईल त्यासाठी आवश्यक विश्वास आम्ही उद्योजकांना दिला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.opponents as they had to step down suddenly from power
एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखती सुरू केल्या आहेत, त्याच दिवशी त्याचा निकाल दिला जाईल, आणखी पदे भरण्याचे काम सुरू झाले आहे असं ते म्हणाले. कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. एस टी कर्मचारी , सिमावासिय यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणत असतील तर विरोधी पक्षनेते देखील घटनाबाह्य च आहेत असं म्हणावं लागेल, सरकार जाता जाता तरतुदी पेक्षा अधिक रकमेचे कार्यादेश दिले आहेत त्यालाच स्थगिती दिली आहे, त्याची तपासणी सुरू आहे योग्य वेळी ती उठवू असं आश्वासन त्यांनी विरोधी पक्षाला दिलं. यानंतर सभागृहाने राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार प्रदर्शक ठराव संमत करण्यात आला.
ML/KA/PGB
3 Mar. 2023