राज्यात येत्या चार दिवसात पावसाचा इशारा
पुणे,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दिवसा आणि रात्री थंडी तर दुपारी पारा ३५ च्या पार असे वातावरण अनुभवास येत आहे. त्यात कालपासून बहुतांश ठिकाणी मळभ दाटून आले होते. या साऱ्या स्थितीत हवामान विभागाकडून राज्यात येत्या चार दिवसात पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शनिवारपासून (दि.४) उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याचाच परिणाम उत्तर कोकणावरही अपेक्षित आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये ढगाळलेले आभाळ दिसू लागले आहे. तसेच पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.
होळीचा सण तोंडावर आला असताना राज्यासमोर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. अनेक ठिकाणी रब्बीत काढलेले धान्य पावसापासून वाचवण्यासाठी कामांची लगबग सुरू आहे.
SL/KA/SL
3 March. 2023